बीडमध्ये सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू   

पवनचक्कीचे साहित्य चोरण्याचा प्रयत्न

बीड : पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांवर सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. गोळीबार करणार्‍या  सुरक्षारक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.रूप सिंग टाकला असे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरामध्ये पवनचक्की उभारणीचे काम सुरू आहे. याच ठिकाणी पवनचक्कीचे साहित्य ठेवण्यात येते. मात्र येथे ठेवण्यात आलेले साहित्य चोरण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या अगोदर चोरीच्या अनेक घटना याठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी सुरक्षारक्षक वाढवण्यात आले होते.  
 
गुरूवारी मध्यरात्री पवनचक्कीचे साहित्य काही जणांनी चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकाने चोरट्यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात एका चोरट्याला गोळी लागली होती. गंभीर जखमी झालेल्या या चोरट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या पवनचक्कीच्या वादातूनच झाली होती. 

Related Articles